भडगावमध्ये माजी नगराध्यक्षांच्या घरासमोर घटना
भडगाव (प्रतिनिधी):- बैलांच्या शर्यतीसाठी मागितलेली वर्गणी देण्यास नकार दिल्याच्या रागातून, भडगाव येथील एका तरुण उद्योजकावर ‘फायटर’ने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात सौरभ विजयकुमार देशमुख (वय २८) हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सौरभ देशमुख हे १० फेब्रुवारी रोजी रात्री ७:३० ते ८:३० च्या सुमारास आपल्या मोटारसायकलने जात होते. भडगाव येथील माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आरोपी हितेश शंकर मारवाडी याने त्यांना अडवले.या संशयित आरोपीने काही दिवसांपूर्वी सौरभ यांच्याकडे बैलांच्या शर्यतीसाठी वर्गणी मागितली होती. मात्र, सौरभ यांनी ती देण्यास स्पष्ट नकार दिला होता. याच कारणावरून संशयित आरोपीने “तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन, आपल्या हातातील लोखंडी फायटरने सौरभ यांच्या डोक्यावर जोरदार वार केले. या हल्ल्यात सौरभ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
हल्ल्यानंतर जखमी सौरभ यांना तातडीने पाचोरा येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांनी दिलेल्या जबाबानुसार, भडगाव पोलिसांनी संशयित आरोपी हितेश मारवाडी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील राजेंद्र सोनवणे करत आहेत. घटनेला दोन दिवस उलटूनही आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ऐन गर्दीच्या ठिकाणी आणि माजी नगराध्यक्षांच्या घरासमोर झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.








