भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव आयुध निर्माणीत फोर पोल स्ट्रक्चरवरील डिस्चार्ज रॉड काढताना मजुराला शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी ९ वाजता घडली.
सुनील अशोक सुरवाडे (४०, शिंदी, ता.भुसावळ) असे मयत मजुराचे नाव आहे. त्याच्याकडे सुरक्षेसाठी हेल्मेट, सेफ्टीबेल्ट, हँड ग्लोव्हज अशी कोणतीही साधने नसल्याने मजुरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. भुसावळ येथील सुनील भिरूड यांनी आयुध निर्माणीतील ११ केव्ही वीज वाहिनी मेंटेनन्सचे कंत्राट घेतले आहे. हे काम मंगळवारी सकाळी ७ वाजता सुरू झाले. सकाळी ९ वाजता काम आटोपून फाईव्ह टाईप जवळ फोर पोल स्ट्रक्चरवरील डिस्चार्ज रॉड काढण्यासाठी शिंदी सुरवाडा (ता.भुसावळ) येथील रहिवासी सुनील सुरवाडे हा मजूर १२ ते १३ फूट अंतरावर चढला. हे काम करून सर्व जण घरी निघणार होते. मात्र ११ केव्हीची लाईन बंद असताना देखील शॉक लागून तो खाली जमिनीवर पडला.
खालील भाग काँक्रिटचा असल्याने त्याला जबर मार लागला. हा प्रकार सुपरवायझर दिलीप कोल्हे यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ आयुध निर्माणीला कळवले. नंतर सुनीलला आयुध निर्माणीच्या दवाखान्यात दाखल केले. पण, वैद्यकीय अधिकारी डॉ.जॉन मथाई यांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सुनील यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. आयुध निर्माणीचे महाप्रबंधक राकेश ओझा यांनी भेट दिली. यावेळी नातेवाईकांनी व युनियन पदाधिकार्यांनी घेराव घालून मदतीची मागणी केली. दरम्यान, वरणगावचे एपीआय भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.