बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील दुर्दैवी घटना
गरीब कुटुंबातील कर्ता पुरुषाच्या जाण्याने हळहळ
जळगाव (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे गेल्या चार दिवसांपूर्वी रविवारी दि. २६ मे रोजी आलेल्या भीषण वादळीवाऱ्याने शहरात मोठी आपत्ती आणली होती. या नैसर्गिक आपत्तीत एका लग्नाच्या ठिकाणी जेवण बनविण्याचे काम करणाऱ्या आचाऱ्याच्या अंगावर भिंत कोसळून तो गंभीर जखमी झाला होता. त्याचा बुधवारी दि. २९ मे रोजी उपचार घेत असताना जळगावात मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे गरीब घरातील कर्ता पुरुषाच्या जाण्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विशाल प्रल्हाद चोपडे (वय ४२, रा. देशपांडे गल्ली, मलकापूर, जि. बुलढाणा) असे मयत इसमाचे नाव आहे. ते मलकापूर शहरात आई, पत्नी, २ मुले यांच्यासह राहतात. केटरर्स व्यवसाय करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. आता त्यांच्या जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. रविवारी दि. २६ मे रोजी चोपडे परिवार हे शहरातील समर्पण लॉन येथील लग्न समारंभाच्या ठिकाणी कॅन्टीन मध्ये स्वयंपाक बनविण्याच्या कामाला गेलेले होते. तेव्हा अचानक भीषण वादळवारा सुरु झाला. यात कॅन्टिनमधील भिंत अचानक ढासळली. भिंत अंगावर कोसळल्याने विशाल चोपडे हे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले होते. त्यांना तत्काळ जळगाव तालुक्यातील डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर अखेर विशाल चोपडे यांचा बुधवारी दि. २९ मे रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे चोपडे परिवारावर शोककळा पसरली असून त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. त्यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आला होता. घटनेची नशिराबाद पोलीस स्टेशनला शून्य नंबरने नोंद करण्यात आली आहे.