भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) : आयुध निर्माणी परिसरातील रहिवाशी असलेला तरुण दि. १२ रोजी घरातून दुपारच्या वेळेस निघून बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या दिवशी शिव मंदिराच्या जवळच असलेल्या तलावात त्याचा मृतदेह आढळून आला. नातेवाईकांनी आक्रोश करीत घातापाताचा संशय असल्याची शंका व्यक्त केली. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आयुध निर्माणी परिसरातील सुशील नगर मधील रहिवाशी दिपक विलास तायडे (२१ ) हा युवक सोमवार दि १२ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कामावरून घरी आल्यानंतर घरात कोणास काहीही न सांगता घरा बाहेर निघुन गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नसल्याने नातेवाईकानी त्यांच्या मित्र मंडळीकडे त्याची विचारपूस करून त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणालाच दिसला नाही. शेवटी वरणगाव पोलीस स्टेशनला त्याच्या हरविल्याबाबत नोंद करण्यात आली होती. दरम्यान मंगळवार दि १३ रोजी निर्माणीच्या वसाहतीच्या परिसरात शिव मंदिरात गेलेल्या काही भाविकांना मंदिराजवळील तलावात काहीतरी पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले.
नीट पाहिले असता एका युवकाचा मृतदेह असल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर खबर त्या युवकाच्या वडिलास दिली. सदर युवक हा आपलाच मुलगा असल्याची खात्री पटल्याने त्यांच्या वडिलांनी जागीच हंबरडा फोडला. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्याबाहेर काढीत वरणगाव ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला विलास तुकाराम तायडे यांच्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील पोहेकॉ याशीन विंजारी हे करीत आहे. दरम्यान, दिपक हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचे कोणासोबत भांडण तंटा नव्हता. आम्हाला घातापाताची शंका असल्याचा आरोप वडीलांनी केला आहे.