आ. एकनाथराव खडसे यांची विधान परिषदेत मागणी
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या जीवितहानीच्या गंभीर प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत आक्रमक पवित्रा घेतला. वन्यप्राण्यांच्या धडकेत किंवा हल्ल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना मिळणारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी सरकारकडे केली.


या मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधताना श्री. खडसे यांनी सांगितले की, पूर्वी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास शासनाकडून ५ लाख रुपये आणि नंतर ती वाढवून १० लाख रुपये मदत करण्याची तरतूद होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात ही मदत देण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे किंवा नियमावलीतील बदलांमुळे बंद करण्यात आली आहे.
एकनाथ खडसे यांनी यावेळी सरकारच्या एका विचित्र निकषावर बोट ठेवले. ते म्हणाले की, सरकार सध्या असा तर्क लावत आहे की, जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जंगलाच्या आत झाला तरच मदत दिली जाईल. मात्र, जर वन्यप्राण्याने जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर येऊन धडक दिली आणि त्यात कुणाचा मृत्यू झाला, तर त्याला ‘जंगलातील मृत्यू’ मानले जात नाही आणि मदत नाकारली जाते.
यावर आक्षेप नोंदवत श्री. खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला की, वन्यप्राणी जंगलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना रस्त्याचा वापर करतातच, मग अशा वेळी झालेला अपघात हा वन्यप्राण्यामुळेच झालेला असतो. अशा तांत्रिक कारणांसाठी पीडित कुटुंबांची मदत रोखणे अन्यायकारक आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात किंवा धडकेत मृत्यू झाल्यास १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान तातडीने दिले जावे, अशी आग्रही मागणी त्यांनी शासनाकडे केली.









