जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : येथून सोयगाव रोडवर असलेल्या बारी मंगल कार्यालयामागील नीलेश बारी यांच्या खळ्यामध्ये गुरे आणि शेळ्या जनावरे बांधलेली होती. शनिवारी रात्री एका वन्य प्राण्याने प्रवेश करून ६ शेळ्या आणि १ म्हशीच्या वासराचा फडशा पाडला.:यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
शेंदुर्णीत बारी मंगल कार्यालयाच्या पाठीमागे बारी यांचे खळे आहे. रात्री अज्ञात वन्यप्राण्याने नागरी वस्तीत प्रवेश करून बारी यांच्या खळ्यात असलेल्या ६ शेळ्या आणि १ म्हशीच्या वासराचा फडशा पाडला. यामधील पाच शेळ्या या गाभन होत्या. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा करून मृत प्राण्यांचे सर्व विच्छेदन करण्यात आले. सकाळी ही बातमी समजल्याबरोबर त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी, ड्रेसर मोरे यांना फोन करून घटनास्थळी बोलाविले. त्यांनी पंचनामा केला. वनपाल देवरे यांनीसुद्धा घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. ही घटना गावाच्या वस्तीजवळ असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.