धावत्या राजधानी एक्सप्रेसमधील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- धुळे येथील एका सेवानिवृत्त वनरक्षकाचा झाशी येथून रेल्वेतून परतत असताना अचानक छातीत कळ येऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.
दिलीप उद्धवराव पाटील (वय ६५, रा.जानकी नगर, धुळे) असे मयत इसमाचे नाव आहे. पत्नी, दोन मुले यांच्यासह ते वास्तव्याला होते. झाशी येथे एका कार्यक्रमासाठी ते दोन दिवसापूर्वी गेले होते. शनिवारी ते रात्री परतण्यासाठी निघाले होते. सकाळी भुसावळजवळ रेल्वे राजधानी एक्सप्रेस आली असताना ते बाथरूमला गेले होते. तेथे अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
जळगावला तातडीने रेल्वे थांबवण्यात आली. त्यांना सुरुवातीला रेल्वे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासले. तेथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पाठवण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. याची माहिती कळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान रेल्वे पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.