रावेर तालुक्यातील पाडले खुर्द परिसरात कारवाई
रावेर (प्रतिनिधी) :- वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना अज्ञात व्यक्ती अवैध वृक्षतोड करताना आढळून आले. या वेळी केलेल्या कारवाईत दुचाकींसह ६३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परंतु, वृक्ष तोडणारे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.
वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन रावेर वनक्षेत्रातील अहिरवाडी परिमंडळातील पाडले खुर्द कक्ष क्र.१ मध्ये अहिरवाडी येथील वनपाल, पाडले खुर्द येथील वनरक्षक गस्त करत होते. यावेळी काही अज्ञात व्यक्ती अवैध वृक्षतोड करत असल्याचे आढळून आले. त्या व्यक्तींचा पाठलाग केला असता ते पळून गेले.
या वेळी तेथे पथकाला धावडा नग व खुंट हे वृक्ष तसेच त्यांच्याजवळ असलेल्या विना नंबरच्या बजाज डिस्कवर कंपनीच्या दोन दुचाकी आढळून आला. हे साहित्य सोडून ते पसार झाले होते. प्रथम दर्शनी वन गुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने या अज्ञात व्यक्तींविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला. एकंदरीत ६३ हजार १११ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे येथील वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक व कॅम्पा समाधाम पाटील यांच्या मार्गदर्शनात वनपाल, वनरक्षक व राऊंड स्टॉफ तसेच वनमजूरांनी केली.