पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्याजवळील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- वाळूची अवैध वाहतूक करणारा डम्पर अडविल्यानंतर वाळूचोरांनी भडगावचे मंडळ अधिकारी कुणाल कोळी यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून डम्पर पळवून नेला. याबाबत कोळी यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. १८ रोजी रात्री २ वाजण्याच्या सुमारास बांबरुड महादेवाचे फाट्याजवळ घडली आहे.
कुणाल कोळी हे प्रशांत कुंभारे, अभिमन्यू वारे, प्रमोदसिंग पाटील या ग्राम महसूल अधिकाऱ्यांसमवेत भडगावहून पाचोऱ्याकडे येत असताना, रात्री २ चे सुमारास बांबरुड महादेवाचे फाट्यावर गेटजवळ वाळूने भरलेले डम्पर अडविले. डम्पर क्रमांक (एम.एच. ४२ टी. ०३३६) चा चालक आणि इतर दहा ते १५ जणांनी कुणाल कोळी यांना शिवीगाळ केली व त्यांचा मोबाईल हिसकावला. ग्राम महसूल अधिकारी अभिमन्यू वारे हे डम्परमध्ये चढले आणि भडगाव तहसीलला घेऊन जाण्यात सांगितले. त्यानंतर जमावाने वारे यांना खाली खेचले. वाळू तेथेच टाकून डम्पर पाचोऱ्याच्या दिशेने भरधाव पसार केले. या प्रकरणी कुणाल कोळी यांच्या फिर्यादीवरून वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.