बिलवाडी-वावडद्यादरम्यानची धक्कादायक घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बिलवाडी ते वावडदा दरम्यान अवैध गौण खनिजाची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून तहसीलदारांच्या पथकाने शुक्रवारी रात्री धडक कारवाई केली. मात्र कारवाई दरम्यान ट्रॅक्टर चालकाने वावडदा तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान संशयित आरोपी ट्रॅक्टर घेऊन फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
याबाबत असे की अवैध गौण खनिज रोखण्यासाठी जळगाव तहसीलदारानी ५ तलाठ्यांचे पथक नेमलेले आहे. शुक्रवारी रात्री अवैध गौण खनिज वाहून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदारांच्या पथकातील वावडदाचे तलाठी राहुल अहिरे, शिरसोलीचे तलाठी भरत ननवरे, म्हसावदचे तलाठी शशिकांत नेरकर, तरसोदचे तलाठी अनिरुद्ध खेतमाळस, नवनियुक्त तलाठी नितीश ब्याळे यांनी वावडदा गाठले. दरम्यान रात्री २ वाजेसुमारास बिलवाडीकडून वावडदा दरम्यान एक ट्रॅक्टर येताना दिसले. त्यात वाळू भरलेली होती. त्याच्याकडे पथकाने कागदपत्रे मागितली. मात्र ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता.
पथकाने त्याला ट्रॅक्टर थांबविण्याचा इशारा केला तर त्याने वावडदाचे तलाठी राहुल अहिरे याच्या अंगावर वाळूचे ट्रॅक्टर घातले. पुढे जाऊन ट्रॅक्टर थांबल्यावर त्याला चाबी देण्यास सांगितले. चाबी देण्यास नकार देत ट्रॅक्टर चालकाने तलाठी अहिरे यांच्याशी झटापटी केली. तलाठी राहुल अहिरे यांना ट्रॅक्टर चालकाने ढकलले. हे ट्रॅक्टर विनायक चव्हाण उर्फ रावण यांचे मालकीचे असून त्यांचा मुलगा सागर चव्हाण हा चालवीत होता. शासकीय कामात अडथळा आणला, वाळू चोरी केली म्हणून फिर्यादी राहुल अहिरे, तलाठी यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांच्या आदेशान्वये एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.