चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या पथकाची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- शहर पोलिस स्टेशनच्या पथकाने दि. १४ रोजी दुपारी ३ वाजता करगांव रोडलगत असलेल्या दयानंद हॉटेलच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला व या छाप्यात ६ हजार रुपये किमतीचे घरगुती वापराचे २ गॅस सिलिंडर, १५ हजार रुपये किमतीचे गॅस भरण्याचे उपकरण, ८० हजार रुपये किमतीची रिक्षा व ८० हजार रुपये किमतीची तीनचाकी रिक्षा असा एकूण १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.याप्रकरणी तिघांविरूध्द चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार राहुल सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला संदीप शरद जाधव (३२, नेताजी चौक), रिक्षाचालक समाधान भरत मोरे (३६, डेराबर्डी), रिक्षाचालक धुडकू सुकदेव वाघ (३८, डोणदिगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून मोटरपंपच्या सहाय्याने रिक्षामध्ये गॅस भरताना आढळून आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, उपनिरीक्षक गणेश सायकर, हेकॉ. राहुल सोनवणे, अमित बाविस्कर, प्रवीण जाधव, भूषण पाटील, पोकॉ. दीपक चौधरी यांच्या पथकाने केली.