जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील एका सालदाराला भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दि. १८ मे रोजी सकाळी सव्वा आठ वाजता घडली आहे. सुरुवातीला अनोळखी असलेला इसम हा नशिराबाद ते जळगाव दरम्यान एका व्यक्तीकडे सालदारकी करीत असल्याची ओळख पटली. त्यानुसार नातेवाईकांना कळविण्यात आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सिरालाल सखाराम सोलंकी (वय ३६, रा. दोंदवाडा जि. बडवानी, मध्यप्रदेश) असे मयत इसमाचे नाव आहे. तो आई, वडील, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होता. सालदारकी करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान दि. १६ मे रोजी नशिराबाद जवळ जय भोले ढाबा जवळ जात असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्याला महामार्गावरील भरधाव जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला होता. त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सुरुवातीला अनोळखी असलेला हा इसम त्याची ओळख पटविण्याचे काम नशिराबाद पोलिसांकडून सुरु होते. उपचार सुरु असताना शनिवारी दि. १८ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांनी ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यात तो सालदार असल्याची माहिती मिळाली. त्याच्या नातेवाईकांना बोलावून रविवारी सिरालाल याचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांना देण्यात आला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.