एरंडोल तालुक्यातील गालापूर रस्त्यावर घटना
एरंडोल (प्रतिनिधी) : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी होऊन तो बाजूला असलेल्या पाटाच्या चारीत साचलेल्या पाण्यात जाऊन पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना दि. २० सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एरंडोल-गालापूर रस्त्यावर घडली.
या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशिकांत राजेंद्र सूर्यवंशी (३८, गालापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. शशिकांत राजेंद्र सूर्यवंशी हा दुचाकीने एरंडोलकडून गालापूर रस्त्याने घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत सूर्यवंशी हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाल्याने तो बाजूला असलेल्या चारीत साचलेल्या पाण्यात जाऊन पडला. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सहायक फौजदार विजय पाटील व राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.