जळगाव तालुक्यात ममुराबाद रस्त्यावर घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील जळगाव ते ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरजवळ शुक्रवारी दि. २७ जून रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास झालेल्या पिकअप वाहनाने दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी सोमवारी दि. ३० जून दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजिदा जुम्मा तडवी (वय ४२, रा. सावखेडा सीम, ता. यावल) असे मृत महिलेचे नाव आहे. सावखेडा सीम येथील जुम्मा फकीरा तडवी (वय ४२) हे पत्नी संजिदा तडवी व परिवारासह राहतात. संजिदा तडवी या बचत गटाच्या सदस्य असल्याने त्या जळगाव येथे आयोजित एका शिबिरात सहभागी झाल्या होत्या. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी २७ जून रोजी शिबीर आटोपल्यानंतर संजिदा तडवी पती जुम्मा तडवी यांच्यासोबत आपल्या दुचाकीने (एमएच १९ ईएल २५८२) सावखेडा सीम येथील घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या.
सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य जळगाव ते ममुराबाद रस्त्याने जात असताना, प्रजापत नगरजवळ एका अज्ञात पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, संजिदा तडवी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती जुम्मा तडवी गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर पिकअप चालक आपले वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी अखेर सोमवारी दि. ३० जून रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप राजपूत करत आहेत.