जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ, विमानतळानजीकच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या एका रिक्षाला भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता घडलेल्या या घटनेत रिक्षाचालकासह चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारचाकी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहिल राजेंद्र भोई (वय २२, रा. खडकी, ता. जामनेर) हा तरुण रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. घटनेच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता साहिल रिक्षा (क्रमांक एमएच १९ बीएम ०५४६) घेऊन जळगावकडून जामनेरकडे जात होता. कुसुंबा गावानजीक, विमानतळाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी त्याने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, (एमएच १९ सीझेड ९७५१) क्रमांकाच्या एका भरधाव चारचाकी वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली.
या अपघातात रिक्षाचालक साहिल भोई याच्यासह रिक्षात बसलेले प्रवासी कलाबाई वसराम नाईक, नागेश विजय नाईक, विकास तेजमल नाईक आणि हरेश्वर पंडित नाईक (सर्व रा. खडकी, ता. जामनेर) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर साहिल भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील चालक देवेंद्र कोल्हे (रा. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गफ्फार तडवी करत आहेत.