जळगाव एलसीबीची कामगिरी
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात सातत्याने होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत, स्थानिक गुन्हे शाखेने महत्त्वपूर्ण कारवाई करत ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत गॅरेज मॅकेनिक असलेल्या एका अरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीच्या ३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली की, माजिदअली लियाकतअली (रा. उस्मानिया पार्क, शिवाजी नगर, जळगाव) नावाचा गॅरेज मॅकेनिक बऱ्याच दिवसांपासून मोटारसायकल चोरत आहे. या माहितीच्या आधारे, दि. ०६ रोजी माजिदअली याला उस्मानिया पार्क येथून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान, या आरोपीने जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून एकूण ०४ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.
चोरी केलेल्या गाड्यांचा तपशील
आरोपी माजिदअली याने चोरी केलेल्या मोटारसायकली खालीलप्रमाणे आहेत:
१) HF Deluxe (क्र. एमएच १९ डिके ११७६): दि. ०४/०४/२०२५ रोजी धुलिया सायकल मार्टजवळून चोरी. (मालक: सरताज कलीम मणियार, रा. नशिराबाद)
२) HF Deluxe (क्र. एमएच १९ सी इ ४८९९) दि. २९/११/२०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चोरी. (मालक: प्रशांत गणेश बडगुजर, रा. आदर्श नगर)
३) Splender Plus (क्र. एम एच १९ बीसी ८४९७): दि. २३/११/२०२५ रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चोरी. (मालक: मनोजकुमार बाबुलाल सैनी, रा. भगवान नगर)
४) ०१ मोटारसायकल: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथून चोरी.
आरोपी माजिदअली हा पूर्वी मोटारसायकल दुरुस्तीचे काम करत असल्याने त्याला मोटारसायकलींच्या तांत्रिक माहितीची चांगली जाण होती. या ज्ञानाचा वापर करून तो चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. चोरी केलेल्या ४ मोटारसायकलींपैकी ०३ मोटारसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोना प्रदीप पाटील पुढील तपास करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोउपनि. शरद बागल, सफी अतुल वंजारी, पोहेकों अक्रम शेख, विजय पाटील, पोना किशोर पाटील, पोकों राहुल रगडे, रविंद्र कापडणे आणि नेत्रम येथील पोकों मुबारक देशमुख व सावदा पोलीस स्टेशनचे श्रेपोउपनि वशीर तडवी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.









