जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील तापी पाटबंधारे विभागांतर्गत असलेल्या वाघूर प्रकल्पाच्या पंपगृहाला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करत मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून, यात सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे महत्त्वाचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी पंपगृहात प्रवेश करून १२०० किलो कॉपरची तार (Copper Wire) आणि १२०० लीटर ऑईल लंपास केले. हे साहित्य प्रकल्पाच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने, चोरीमुळे पाटबंधारे विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेनंतर तातडीने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तालुका पोलीस या चोरीचा अधिक तपास करत असून, चोरट्यांचा आणि चोरीला गेलेल्या मालाचा शोध घेत आहेत.









