चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे शेतात बांधलेल्या म्हशीचे दूध काढून घरी जात असताना एकाला लोखंडी फावडीने डोक्यात मारहाण करून जबर दुखापत पोहोचल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले आहे.
भुषण गोकुळ जाधव (वय-२६), रा. वाघळी, ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्यास असून शेती व्यवसाय करून कुटुंबाचे उदरनिर्वाह तो करीत असतो. दरम्यान शेतात स्वतःच्या मालकीचे म्हशी असल्याने भुषण हा भावासह दुध काढून बुधवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास चांभाडी ते वाघळी रोडने घरी जात असताना चुलत भाऊ नितीन राजेंद्र जाधव व दिलीप राजेंद्र जाधव यांनी कालचा विषय मोडून काढ असे सांगत शिवीगाळ केली. त्यावर भुषण जाधव यांनी तो विषय हा न्यायालयाचा आहे. असे सांगून शिवीगाळ करू नका असे सांगत असताना नितीन राजेंद्र जाधव यांनी जवळच पडलेल्या लोखंडी फावडीने भुषण जाधव याच्या डोक्यात मारहाण केली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यावेळी सोबत असलेला भाऊ पवन याने मध्यस्थी केली असता त्याला नितीन याने बाजूला ढकलून दिले. त्याचवेळी भुषणचा काका सुधिर भिकन जाधव हा धावत आला. तेवढ्यात अंबादास भगवान जाधव हा येऊन सुधिर जाधव याला धरून ठेवून नितीन जाधव व दिपक जाधव यांनी लोखंडी फावडीने मारहाण केली. भुषण ची आई कमलाबाई गोकूळ जाधव मागून येऊन वाद शमविण्यासाठी प्रयत्न करीत असताना नितीन जाधव यांनी लाथाने मारून खाली पाडले. त्याचवेळी मिराबाई राजेंद्र जाधव व गंगूबाई भगवान जाधव या दोघांनी कमलाबाई हिला शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी अंबादास भगवान जाधव यांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या वादात भुषण जाधव याला जबर दुखापत झाल्याने त्याच्यावर चाळीसगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्याच्या जबाबवरून ग्रामीण पोलीस स्थानकात नितीन राजेंद्र जाधव, दिपक राजेंद्र जाधव, अंबादास भगवान जाधव, मिराबाई राजेंद्र जाधव व गंगूबाई भगवान जाधव सर्व रा. वाघळी ता. चाळीसगाव यांच्या विरुद्ध भादवी कलम- ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४ व ५०६ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.