रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथील घटना
रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील खिर्डी येथून जवळच असलेल्या तांदलवाडी येथे नुकत्याच आलेल्या वादळी वार्यामुळे अनेक झाडे कोलमडली व बाजार पट्टा भागात पक्षांचा अधिवास असलेले वृक्ष कोसळल्याने अनेक पक्षी जखमी झाले तर पिंपळ व वडाची झाडे तीन ते चार ठिकाणी कोलमडून १०० पेक्षा अधिक पोपट जागीच मृत्यूमुखी पडले. घटनास्थळी जखमी पक्षांवर रात्री उशिरापर्यंत उपचार करण्यात आल्याने त्यांना जीवनदान मिळाले.
पक्षीमित्रांनी व तरुणांनी परिसरातील झाडांखाली पडलेल्या पक्षांचा शोध घेवून त्यांना एकत्रीत करीत त्यांच्यावर उपचार केले. रात्री उशीरापर्यंत पक्षी मित्रांनी धडपड करत पक्ष्यांवर प्राथमिक उपचारासाठी रावेरात नेण्यात आले. रावेर येथील पशूवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर तब्येतीत सुधारणा झालेल्या पक्ष्यांना अधिवासामधे सोडण्यात आले तर जखमी पक्ष्यांवर उपचार सुरु आहे. पक्षी वाचवण्यासाठी तांदलवाडी येथील किरण महाजन यांनी घटनेची माहिती चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे खिर्डी येथील पक्षी मित्र संकेत पाटील, यांना दिली. संकेत पाटील व वनरक्षक युवराज मराठे यांनी घटनास्थळी पोहोचून जखमी पक्ष्यांवर उपचार सुरू केले.
यावेळी रावेर वनविभागाचे वनरक्षक युवराज मराठे, किरण महाजन, खिर्डी येथील पक्षी मित्र गुणवंत ढाके, हर्षल फालक, प्रफुल्ल शिरनामे, मोहनीश तायडे, मोहित महाजन यांनी उपचार केले. चातक संस्थेचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन, उदय चौधरी व रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांनी मार्गदर्शन केले.