जळगाव (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी नगरातील वासू सपना कॉम्प्लेक्स येथील वॉचमनला काहीही कारण नसतांना काही टवाळखोर मुलांनी शिवीगाळ करून दगडफेक केल्याने त्यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याची घटना बुधवारी १ मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, शाहरूख अली शौकात अली सैय्यद ( वय २९), रा. छत्रपती शिवाजी नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबासह राहायला आहे. ते छत्रपती शिवाजी नगरातील वासू सपना कॉम्प्लेक्स येथे वाचमन म्हणून नोकरीला आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे बुधवारी १ मे रोजी मध्यरात्री ते ड्यूटीवर असतांना पहाटे ३ वाजेच्या सुमारास अनोळखी जणांची टोळी तिथे आली. काहीही कारण नसतांना शाहरूख अली यांना शिवीगाळ केली. त्यानंतर अनोळखी ९ जणांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे त्यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली. ही घटना घडल्यानंतर शाहरूख अली शौकात अली सैय्यद यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सकाळी ६ वाजता शहर पोलीस ठाण्यात अनोखळी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.