नवी दिल्ली ;– बायकोची छेड काढल्याच्या रागाने तीन तरुणांनी आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. उत्तर प्रदेश येथील फतेहपूर येथे ही घटना घडली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फतेहपूर येथील मलवा गावातला प्रदीप कुमार हा तरुण रविवारी आपल्या शेतात गेला होता. बराच वेळ तो शेतातून परतला नाही, म्हणून त्याच्या वडिलांना काळजी वाटायला लागली. त्यांनी काही जणांच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना शेतातल्याच एका झोपडीत त्याचा रक्तबंबाळ अवस्थेतला मृतदेह सापडला. त्याच्या गळ्यावरून कुणीतरी धारदार शस्त्र फिरवलं असल्याचं दिसून येत होतं. तसंच त्याच्या उजव्या हाताची तीन बोटंही कापली गेली होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. तेव्हा काही ग्रामस्थांनी प्रदीपला त्याचा मित्र रजोल याच्यासोबत शेवटचं पाहिल्याचं सांगितलं. संशयावरून रजोल याला ताब्यात घेण्यात आलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खून केल्याचं कबूल केलं. प्रदीप याने रजोलच्या पत्नीची काही दिवसांपूर्वी छेड काढली होती. त्याचा राग रजोलच्या मनात होता. त्याने दोन अन्य मित्रांच्या साथीने प्रदीप याच्या हत्येचा कट रचला.
प्रदीपला शेतातील झोपड्यात नेऊन तिथे त्या तिघांनी त्याची निर्घृण हत्या केली. हत्येसाठी त्यांनी त्याच्या मानेवर वीट ठेवली होती. त्या विटेच्या बाजूला अतिशय भीषण पद्धतीने कुऱ्हाडीचे वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.