“नांदेड” पार्शवभूमीवर जळगाव जीएमसीच्या अधिष्ठातांना सामाजिक कार्यकर्त्यांचे निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- ठाणे, नांदेड व घाटी येथे झालेल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवाची पुनरावृत्ती जळगाव शासकीय रुग्णालयात होऊ नये म्हणून उपचारापेक्षा खबरदारी चांगली हा उपक्रम अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी राबवावा अन्यथा जळगाव येथे अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास संपूर्ण यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या शिष्टमंडळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकार व शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांची, डॉक्टरांची दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणा यामुळे महाराष्ट्राच्या जनते च्या जीवाशी खेळ सुरू आहे. हा प्रकार जळगावात घडणार नाही ना अशी भीती वाटू लागली आहे. महाराष्ट्रातले तीन प्रमुख पक्षाचे तीन कॅबिनेट मंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्याने जळगावला जीव रक्षक औषध साठा, डॉक्टरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनुष्यबळ अथवा रक्त साठा अभावी कोणाचा मृत्यू होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
समता परिषदेच्या निवेदिता ताठे, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एमआयएमचे अध्यक्ष अहमद ,कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, हूसेनी सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, एमपीजेचे अध्यक्ष आरिफ देशमुख, बीवायएफचे अध्यक्ष शीबान फा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा उपाध्यक्ष डॉ. शाकीर, इदगाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, नुरी फाऊंडेशनचे नाजीम शेख, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, मरकज फाउंडेशनचे रफिक शेख, उस्मानियाचे समाजसेवक समीर शेख आदींची उपस्थिती होती.