नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला होता. त्यानंतर या नराधमांनी तिची जीभही कापली. या पीडितेवर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, चंदपा येथे राहणाऱ्या दलित तरुणीवर १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार झाला होता. आपल्या आईसोबत तरुणी शेतावर चारा गोळा करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी पीडितेचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा करताच आरोपींनी पीडितेची जीभ कापली. गंभीर अवस्थेत जखमी झालेल्या तरुणीवर एम्समध्ये उपचार सुरू होते, मात्र या पीडितेला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
याप्रकरणाची पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात चारही आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रम वीर यांनी सांगितले होते.