चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आघाडीत होणार बिघाडी
जळगाव (विशेष प्रतिनिधी) :- चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून उन्मेष पाटील यांना एबी फॉर्म मिळाल्याची चर्चा वेग धरू लागल्यामुळे राजीव देशमुख आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, उन्मेष पाटील विरुद्ध मंगेश चव्हाण असा सामना राहणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाकडून मंगेश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर सैनिक समाज पार्टीकडून देखील वाल्मीक सुभाष गरुड यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर आता उन्मेश पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्याची चर्चा जोर धरू लागली असून एबी फॉर्म घेऊन ते चाळीसगावच्या दिशेने रवाना झाले असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे राजीव देशमुख हे तुतारीचे चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आता ठाकरे गटाकडे गेल्यामुळे ते अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
राजू देशमुख जर अपक्ष उभे राहिले तर उन्मेश पाटील यांच्या मतांमध्ये विभागणी होईल काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे याचा फायदा भारतीय जनता पक्षाचे मंगेश चव्हाण यांना होऊ शकतो असेही जाणकारांचे मत आहे भविष्यामध्ये हे चित्र आता रंगतदार होणार आहे.