विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे आजपासून कामबंद
जळगाव (प्रतिनिधी) – विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटना आता 1 ऑक्टोबर पासून राज्यस्तरीय कामबंद आंदोलन सुरू करीत आहे. दरम्यान, सकाळी गुरुवारी सकाळी 10 वाजता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागण्यांविषयी चर्चा करणार आहेत.
कर्मचारी संघटना पदाधिकारी आणि उच्च व तंत्र शिक्षण संचालकांशी बुधवारी झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. मागण्याबाबत माहिती देऊन शिक्षणमंत्र्यांकडे म्हणणे पाठवू असे दोन्ही संचालकांनी संघटनेच्या प्रतिनिधींना उत्तर दिले होते. त्यामुळे तिढा सुटला नाही. दरम्यान, विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची बैठकही रात्री उशिरा संपली.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे कोरोन्टाईन असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी 10 वाजता विद्यापीठ व महाविद्यालय कर्मचारी संघटनेच्या कृती समितीचे शिष्टमंडळ आता उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे राज्यभरातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.