३ गावठी पिस्तुलांसह काडतुसाची वाहतूक करणारा राजस्थानी तरुण जेरबंद
चोपडा शहर पोलिसांची धडक कारवाई
चोपडा ( प्रतिनिधी ) – मध्य प्रदेशातील उमर्टी या गावातून शस्त्रांची होणारी तस्करी पुन्हा एकदा उघड झाली आहे. बसमधून तीन गावठी पिस्तुलांसह काडतूस व रोख रक्कम घेऊन चोपडा शहरात येणाऱ्या एका राजस्थानी तरुणाला शिताफिने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. एक तरुण गावठी पिस्टल घेऊन चोपडा शहराकडे येत आहे. त्यावरून चोपडा शहर पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी तात्काळ सहा. पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोउनि घनशाम तांबे, पोहेकॉ विलेश सोनवणे, पोहेकॉ संतोष पारधी, पोहेकॉ शेषराव तोरे, पोना संदीप भोई, पोकॉ मिलींद सपकाळे, पोकॉ रविंद्र पाटील, पोकॉ प्रकाश मथुरे, पोकॉ प्रमोद पवार, पोकॉ आत्माराम अहीरे या पथकास रवाना केले व सापळा रचला.
चुंचाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गुप्त बातमीप्रमाणे त्यांनी उमर्टीकडुन चोपडाकडे येणारी बस थांबवुन बस मधील संशयीत युवकाची ओळख पटवली. त्याचे जवळ असलेल्या बॅगची तपासणी केली. त्यामध्ये १ लाख ३० हजार रु कि. चे गावठी बनावटीचे ३ पिस्टल, २ हजार रु किमतीचे १ खाली मॅगझीन व १० हजार रु कि. चे १० जिवंत काडतुस तसेच रोख ३ हजार ३०० रु व ५ हजार रु कि.चा १ मोबाईल फोन असा एकुण १ लाख ५० हजार ३०० रु किं. चा मुद्देमाल आढळला.
संशयित आरोपी हनुमान गेनाराम चौधरी (वय २१ वर्ष रा. लोहावत जि. जोधपुर, राजस्थान) याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सदरचे पिस्टल व काडतूस हे उमर्टी, मध्यप्रदेश येथे राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्ती कडुन सत्रासेन येथे ताब्यात घेतल्याचे त्याने सांगितले. सदर संशयित आरोपी विरुध्द चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन गुन्ह्याचा पुढील तपास चोपडा सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले आणि शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजित सावळे हे करीत आहेत.