जळगाव (प्रतिनिधी ) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा निव्वळ घोषणाबाज असल्याचा भासत आहे. सहकार, शेती क्षेत्र, आरोग्य, गुंतवणूक यासारख्या महत्वाच्या बाबींसंदर्भात भरीव तरतुदीची अपेक्षा होती.असे मत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी बोलतांना व्यक्त केली.
ते म्हणाले कि, ज्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. त्या प्रत्यक्षात कशा अंमलात आणल्या जातील याविषयीचे ठोस नियोजन दिसत नाही. आरोग्य क्षेत्र डिजीटल करण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली असली तरी त्याची व्याप्ती आणि स्वरूप कसे राहील हे स्वप्नरंजनच आहे. कोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रात कमालीचे बदल झाले आहेत. त्यादृष्टीने आरोग्यासाठी भरीव तरतूद करणे आवश्यक होते. कररचनेत कुठलाही बदल न झाल्याने सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
देशात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. यापुर्वीच मोदी सरकारने २ कोटी रोजगाराची घोषणा केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाही. तोच आता नव्याने ६० लाख रोजगारांची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. २०४७ च्या विकासाची ब्लु प्रिंट म्हणून घोषित झालेला हा अर्थसंकल्प केवळ घोषणाबाजच असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी दिली.