मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबई तसेच उपनगरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अक्षरश: विस्कळीत झाले आहे. पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. याच मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज (18 जुलै) सायंकाळी 6 वाजता होणार असून या बैठकीत मुसळधार पावसामुळे मुंबईत उद्भवलेल्या आपत्तीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असेल. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवराच्या (18 जुलै) रात्रीपासून पावचाने जोर धरला आहे. मुंबई तसेच उपनगरांत अनेक ठिकाणी पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला असून मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. लोकल ट्रेनवरसुद्धा याचा विपरित परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. विक्रोळीतदेखील अशाच प्रकारची आणखी एक घटना घडली. या दोन्ही दुर्घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. या सर्व गोष्टींमुळे मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे. ठीक सहा वाजता ही बैठक होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात शनिवारी रात्री 11 ते रविवारी पहाटे 4 यादरम्यान सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या महानगरपालिकेच्या 60 स्वयंचलित हवामान केंद्रांवर ही नोंद करण्यात आली. दहिसर, चेंबूर, विक्रोळी, कांदिवली, मरोळ, बोरिवली, वरळी आणि किल्ला परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर असणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्रांमध्ये तब्बल 200 मीमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
पुढचे पाच दिवस कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाचे, IMD कडून रेड, ऑरेंज ॲलर्ट जारी







