रावेर तालुक्यात मोरव्हाल गावात १७ लाखांचा पोलिसांकडून माल जप्त
रावेर (प्रतिनिधी) : येथील पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोरव्हाल शिवारातील एका शेतात छापा टाकत तब्बल १७१ किलो वजनाची गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. संशयित आरोपीने शेतात तुरीच्या आड गांजाची लागवड करून मोठा अंमली पदार्थ साठा उभारल्याचे उघड झाले आहे. प्रकरणात मोबाईल फॉरेन्सिक पथकाची कामगिरी महत्वाची ठरली आहे. जप्त केलेल्या गांजाची अंदाजित बाजारमूल्य तब्बल १७ लाख रुपये इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना दि. ९ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सकाळीच रावेर पोलीस, गुन्हे शोध पथक आणि फॉरेन्सिक पथक मोरव्हाल शिवारातील युसुफ अकबर तडवी (वय ५०, रा. मोरव्हाल) या शेतकऱ्याच्या शेतावर पोहोचले. तपासादरम्यान समोर आले की, संबंधित शेतकऱ्याने तुरीच्या पिकाच्या मधोमध गांजाची झाडे लपवून ठेवली होती. या शेतात एकूण दोन एकर जागेत कॅनाबिस (गांजा) सदृश अंमली पदार्थाची लागवड करण्यात आली होती. एकूण १७२ लहान-मोठी झाडे सापडली असून त्यांचे एकत्रित वजन १७१ किलो इतके आहे.
पोलिसांनी पंचासमक्ष जागेवरच फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची अंदाजित बाजारमूल्य तब्बल १७ लाख रुपये इतकी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरचे शेत अत्यंत दुर्गम भागात असल्याने पोलिसांनी जवळपास ३ किलोमीटर परिसरात सकाळी ८ वाजेपासून झाडाझडती घेत बातमीची खातरजमा करून कारवाई केली. या प्रकरणी आरोपी युसुफ तडवीवर अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पोउपनिरीक्षक तुषार पाटील, मनोज महाजन, गुन्हे शोध पथकाचे पोना कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील, तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.