चोपडा तालुक्यात ग्रामीण पोलिसांची कारवाई
चोपडा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उत्तमनगरात तुरीच्या शेतात गांजाची शेती केल्याचे पोलिसांनी उघड केले असून संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा ३८ लाख रुपयांचा असल्याची माहिती मिळत असून याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला पुढील तपास सुरु आहे.
तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगामधील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा याच्या तुरीच्या शेतामध्ये गांजाची शेती केल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी शेतात आपला मोर्चा वळवित तब्बल ८ क्विंटल वजनाचा दोन ट्रॅक्टर ओला गांजा जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी ता.२४ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी केली आहे. यात पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जमा केलेल्या जवळपास ८ क्विंटल ओल्या गांजाची किंमत सुमारे ३८ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उत्तमनगर येथे रवी किलाऱ्या पावरा या शेतकऱ्याने तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली असल्याची गुप्त माहिती ग्रामीण पोलिसांना दुपारी तीन वाजेच्या सुमारास मिळाली होती. त्याआधारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचत दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओला हिरवा गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेले दोन ट्रॅक्टर गांजा जप्त करीत पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यानंतर नायब तहसीलदार सचिन बांबोडे यांनी पंचनामा केला.
कारवाईत रवी पावरा फरार झाला असून त्याचा अल्पवयीन भाऊ पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. कारवाई पोलिस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर, पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर, सहा फौजदार देविदास ईशी, हवालदार राकेश पाटील, किरण पाटील, पोलिस शिपाई रावसाहेब पाटील, प्रमोद पारधी, विशाल जाधव, दिलीप पाटील आदींनी केली. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.