हात पंप विज पंप देखभाल, दुरुस्ती कर्मचारी संघटनातर्फे सत्कार
जळगाव (प्रतिनिधी) : तुम्ही आज माझ्या सत्कार सन्मानसाठी जी शाल दिली तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणी पुरवठा खात मागितले नव्हते. कॅबिनेटमध्ये वर्णी लागत असल्याने मी समाधानी होतो, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं. जळगावमध्ये हात पंप विज पंप देखभाल व दुरुस्ती कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्याच्यातर्फे कृतज्ञता सोहळा हा आयोजित करण्यात आला होता. मंत्री गुलाबराव पाटील यांचा या ठिकाणी मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
गुलाबराव पाटील म्हणाले, वडील विरोधी पक्षात काँग्रेसचा प्रचार करत होते,मी बाळासाहेब यांच्या सेनेचा प्रचार करत विजयी झालो. सरकारमधे राज्य मंत्र्याला फारसे करून घेता येत नाही, पाणी पुरवठा खातं आलं आणि आमच्या लोकांना महत्त्व आले. मी देव दुत नाही,गरिबी जवळून पाहिली आहे. कष्ट करणाऱ्यांचे पैसे खाणाऱ्याचे हात लुळे झाल्याशिवाय राहणार नाहीत, परमेश्वराने माझ्या हातून हे काम करायचे ठरवले असेल म्हणून झाले. जनतेला पाणी पाजन्याचं काम करण्याचे भाग्य मला मिळाले. आयुष्यात आता लोकांसाठीच काम करायचे आहे. राजकारणात आपण बडेजाव केला नाही,पण जिथे गरज आहे तिथे मंत्री म्हणून ते केले.
आमदार जर मंत्री होऊ शकतो तर डेप्युटी इंजिनिअरने वरिष्ठ अधिकारी होऊ नये का? असा सवालही पाटील यांनी केला. पुढे बोलताना पाटील म्हणाले, मंत्र्याने आपल्या डिपार्टमेंटमधील कर्मचारी खुश ठेवायला पाहिजेत,तरच चांगला काम होऊ शकतं. मी माझ्या खात्यात अनेकांना प्रमोशन दिले, माझ्या सारखा प्रमोशन देणारा दुसरा कोणी नसेल. आमची शेवटची ओव्हर आहे. निवडणुकीत हेच आशीर्वाद कामात येणार आहे. किती लोकांची कामे केली हे महत्वाचे आहे. ही शिदोरी बरकत आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.