यावल तालुक्यातील साकळी येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी या गावातील मुजूमदार नगरात घराबाहेर लावण्यात आलेल्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी चोरी झाल्या. गावातील चार जणांनी मिळून दोन बॅटरी चोरी केल्या. या बॅटऱ्यांची किंमत १२ हजार रुपये आहे. हा प्रकार रविवारी निदर्शनास आल्यानंतर सोमवारी यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध बॅटरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांकडून बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या आहे.
साकळी गावात मुजुमदार नगर आहे. या मुजुमदार नगरमध्ये सय्यद अश्पाक सय्यद शौकत (३२) हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या अंगणात त्यांचे दोन ट्रॅक्टर लावले होते. त्यांच्या ट्रॅक्टरमध्ये त्यांनी लिव्हगार्ड कंपनीच्या दोन बॅटरी लावल्या होत्या. ज्यांची किंमत १२ हजार रुपये होती. या दोन्ही बॅटरी ट्रॅक्टरमधुन भूषण राजू तायडे, दशरथ शालिक भालेराव, साहिल उर्फ समाधान रवींद्र सुरवाडे व रणधीर विलास सोनवणे (सर्व रा.साकळी) या चार जणांनी चोरी केल्या.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौघांकडून पोलिसांनी दोन्ही बॅटरी हस्तगत देखील केल्या आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अर्जुन सोनवणे करीत आहे.