जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- खताच्या गोण्या घेऊन आल्यानंतर त्या दुकानावर उतरवण्यासाठी ट्रकवर चढून दोर सोडत असताना विजेचा धक्का लागून तरुण ट्रक चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तालुक्यातील आव्हाणे येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरसिंग प्रल्हाद सूरनार (२९, रा. बनवास, जि. परभणी) असे या तरुणाचे नाव आहे. नरसिंग सूरनार हा ट्रक चालक बुधवारी सकाळी आव्हाणे येथे खताच्या गोण्या घेऊन आला होता. काही दुकानावर खत उतरवण्यासाठी एका ठिकाणी ट्रक थांबवून चालक ट्रकवर चढला व दोर सोडत असताना वीज तारांचा स्पर्श होऊन जोरदार विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते खाली काँक्रिट रोडवर पडले. त्यावेळी गावकऱ्यांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोहचले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.