कासोदा नाक्यावर भीषण अपघात
एरंडोल (प्रतिनिधी) – कासोदा नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात ६६ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगेश शिवदास पाटील (रा. पाटीलवाडा, एरंडोल) असे मृताचे नाव आहे. या अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, एरंडोल पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


रविवारी २२ मार्च रोजी दुपारी मंगेन पाटील हे आपल्या मोटारसायकलने (क्र. एम एच १९ डीएक्स १०९४) शेताकडे जात होते. कासोदा नाक्यासमोरील राष्ट्रीय महामार्गावर जळगावकडून धुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने (क्र. डीडी ०१५ ९१०३) त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत पाटील यांच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. घटनास्थळी उपस्थित नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने खासगी वाहनाने एरंडोल येथील कल्पना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
अपघातानंतर संबंधित ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेमुळे एरंडोल परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास एरंडोल पोलीस करत आहेत.









