जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव भुसावळ महामार्गावर जळगावकडे येणारी धावती ट्रक आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक पेटल्याने खळबळ उडाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
धुळे येथून हि ट्रक पुठ्ठा भरून नशिराबाद परिसरातील एका कारखान्यात गेली होती. कारखान्यात पुठ्ठ्याच्या माल रिकामा करून जळगावकडे परत येत असतांना ट्रक ( क्र. एम. एच. १८ एम. ०९६२ ) चालकाच्या कॅबिनमधील बॅटरीचे शॉर्टसर्किट होऊन पेटली होती. आग भडकल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान दाखवून चालकाने बाहेर उडी घेतली. गायत्री पेपर मिल या कारखान्यातून हि ट्रक येत होती. चालकाचे नाव सादिक वाहेद शेख (रा. एरंडोल) व मालकाचे नाव मिलिंद महसूल (रा. जळगाव ) असल्याचे सांगण्यात आले. हि आग विझविण्यासाठी नशिराबाद पोलीस ठाण्याचे हे. कॉ. अतुल महाजन, पोलिसांचा वाहन चालक अस्मत अली बशीर अली सैयद आणि पो. कॉ. विजय आहिरे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्रयत्न केले. नशिराबाद पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.