कर्जामुळे केलेला बनाव भुसावळ तालुका पोलिसांच्या तपासात उघड
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुर्हा चोरवड मार्गावर जामनेरकडून भुसावळकडे येत असलेल्या ट्रकला थांबवित, गाडीत काय आहे, दाखव असा बहाणा करून चालकाला वाहनात खाली उतरवून तीन चोरट्यांनी ट्रक लांबविल्याची घटना गुरुवार दि. १६रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास कुर्हा पानाचे गावाजवळ घडली. यात पोलिस तपासात, फिर्यादीच कर्जबाजारी झाल्याने त्याने ट्रक जळगावात भंगारात विकल्याची बाब समोर आली आहे.
ज्यांनी ट्रक घेतली तेच ट्रक घेऊन गेले. मात्र विम्याची रक्कम मिळावी यासाठी फिर्यादीने ट्रक चोरून नेल्याचा बनाव उभा केल्याने भुसावळ तालुका पोलिसांनी २४तासांच्या आत हे बिंग फोडले आहे. नांदेड येथून माल रिकामा करून भुसावळ येथे जामनेरमार्गे येत असलेला ट्रक (एम.एच.१९ झेड ४२५०) कुर्हापासून दोन किमी अंतर भुसावळकडे आल्यावर रस्त्यात तीन जणांनी गाडी थांबवायला लावली. गाडीत काय आहे, आम्हाला दाखव असे सांगत चालक मोहंमद सलमान अब्दुल रऊफ खान (रा. मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलमागे खडके, ता. भुसावळ) याला गाडीच्या खाली उतरविले. यावेळी तिन्ही जणांपैकी एक जण ट्रकवर चढला तर अन्य दोन जण सुध्दा ट्रकमध्ये चढून त्यांनी ट्रक घेऊन काढल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास डीवायएसपी कृष्णात पिंगळे, भुसावळ पोलिस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नंदकिशोर काळे यांनी केला. त्यांनी त्या भागातील सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे चोरटे मोटरसायकलवर आल्याचे सांगितले. मात्र सीसीटिव्ही फुटेजमध्ये कुठेही मोटरसायकल त्यावेळी दिसून आली नाही. त्यामुळे फिर्यादीला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपण कर्जबाजारी झाल्याने ट्रक जळगावला भंगारवाल्यांना विकला व त्यांनीच ट्रक नेल्याचा जवाब दिला.
ट्रक चोरून नेल्याची फिर्याद देणारा मोहंमद सलमान अब्दुल रऊफ खान (रा. मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलमागे खडके, ता.भुसावळ) हा कर्जबाजारी झाल्याने त्यांने ७ जानेवारी २०२५ रोजी गाडी जळगावला विकली, त्या गाडीच्या विम्याचे पैसे मिळावे यासाठी खान याने ट्रक पळवून नेल्याचा बनाव केल्याचे तपासात समोर आले आहे. मोहंमद सलमान अब्दुल रऊफ खान (रा. मुस्लीम कॉलनी, हिरा हॉलमागे खडके,ता. भुसावळ) याने पोलिसांना खोटी फिर्यादी दिल्याने व पोलिसांची दिशाभूल केल्याने पोलिसांनी त्याच्याविरूध्द तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी सांगितले.