एरंडोल तालुक्यात भातखंडे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीस्वाराला उडवल्याने ४० वर्षीय शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात उत्राण ते भातखंडे बुद्रुकदरम्यान घडला. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली व ही नोंद शून्य क्रमांकाने कासोदा पोलिस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आली.

समाधान काशीनाथ पाटील (वय ४०, रा. उत्राण ता. एरंडोल) असे मयताचे नाव आहे. मयत समाधान पाटील यांच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे. समाधान पाटील हे शेतमजुरी करुन आपला व परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. समाधान पाटील हे बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता उत्राण येथुन गिरडला त्यांच्या भाच्याला मुलगा झाल्याने पाहण्यासाठी आले असता उत्राण ते भातखंडे बुद्रुकदरम्यान समोरून भरधाव येणार्या ट्रॅक्टरने समाधान पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात समाधान पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी समाधान पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली.









