जळगाव (प्रतिनिधी)- येथील एमआयडीसी भागात ट्रक व कारचा पद्घात झाला होता. त्यावेळी वाहन बाजूला घ्या असे सांगितल्याचा राग आल्याने ट्रक चालकाने दोन वाहतूक पोलिसासह चार पोलिसांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहतूक नियंत्रण शाखेचे कॉन्स्टेबल साहेबराव सुभाष कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चौक येथे बुधवारी ३० रोजी दुपारी ४. ३० वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असतांना औरंगाबादकडून येणारी ट्रक क्रमांक (एम. एच. १९. सी. वाय. १५८१) वरील चालकाने पांढऱ्या रंगाची कार क्रमांक ( एम. पी. ०९ सीटी -४२६४) ला जोरदार धडक दिली. यावेळी गर्दी वाढल्याने साहेबराव कोळी व कॉन्स्टेबल शरद सुलाने यांनी दोन्ही वाहनांना बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी वाईट वाटून ट्रक चालकाने कार चालकाला शिवीगाळ केली. त्यावेळी ट्रक चालकाने वाहतूक पोलिसांनाही शिवीगाळ केली. तसेच त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारत जखमी केले.
यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील व विजय बावसकर यांनी देखील येऊन ट्रक चालकाला आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाने त्यांच्याशी देखील झटापटी केली. यावेळी ट्रक चालकावर नियंत्रण आणून त्याला एमआयडीसी पोलीस स्टेशनला आणले. या घटनेत दोन्ही वाहतूक पोलिसांचे कपडे फाटले. यात सुलाने यांच्या गुडघ्याला जखम झाली. ट्रक चालकाला नाव विचारले असता त्याने किशोर शांताराम पाटील (रा. खोटेनगर ) असे सांगितले. तर कार चालकाचे नाव सतीश गोपाळ राणे व त्याच्यासोबत असणारे डॉ. महेंद्र मधुकर पाटील (दोन्ही रा. शिवरामनगर) असे आहे. त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्थानकात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी ट्रकचालक किशोर पाटील यास अटक करण्यात आली आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी भेट दिली. तपास पीएसआय संदीप पाटील, राजेंद्र कांडेलकर करीत आहेत.








