यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली या गावातील भवानी पेठेतील दुकानदाराकडून अन्न-औषध खात्याचे अधिकारी असल्याचे सांगत दोघांनी ५० हजाराची खंडणी घेतली होती. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्यानंतर या गुन्ह्यात चिंचोली येथील एका मास्टरमाईंडचा समावेश असल्याचे समोर आले आहे. संशयीताचा शोध पोलीस घेत आहेत. अटकेतील दोघांना ५ सप्टेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चिंचोली गावातील भवानी पेठेत संतोष हरी बडगुजर यांच्या किराणा दुकानात दि. ७ जुलै रोजी आकाश भगवान जावरे (वय २९, रा.आंबेडकर चौक, नंदुरबार) व राहुल श्रीहरी काळे (वय ४३, रा.कात्रज, पुणे) हे दोघे आले. आम्ही अन्न-औषध खात्याचे अधिकारी आहोत, तुम्ही विमल गुटखा विकतात म्हणून तुमच्या विरुद्ध कारवाई करायची आहे. तुमची पत्नी आणि मुलगा यांना अटक करायची आहे, असे सांगून त्यांना दम दिला. जर तुम्हाला अटक टाळायची असेल तर २ लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली. संबंधित दुकानदाराने त्यांना ५० हजार रुपये दिले आणि ते तिथून निघून गेले. पुन्हा हे दोघे शुक्रवार दि. ३० ऑगस्ट रोजी गावात आले आणि त्यांनी परत दुकानदाराकडे पैशांची मागणी केली.
यावेळी दुकानदाराने पोलिसात तक्रार दिल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. तपासात या गुन्ह्यात चिंचोली गावातील संशयीत मुख्य मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. अटकेतील दोघांना पूर्वी तीन दिवसाची पोलिस कोठडी होती व सोमवारी पुन्हा दोघांना भुसावळ येथील न्यायालयात न्या.एस.व्ही.जंगमस्वामी यांच्या समोर हजर केले असता दोघांना ५ सप्टेंबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.