कासोदा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ; संशयित आरोपी ह्या परराज्यातील टोळी
एरंडोल (प्रतिनिधी) : कासोदा पोलीस स्टेशन परिसरातील तीन तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लग्न लावून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन वधूंसह २ एजंट महिला यांना कासोदा पोलीस स्टेशनने कसून तपास करीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. यामुळे कासोदा पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लग्नाळू व्यक्तींना हेरुन त्यांच्याशी मध्यस्तांमार्फत संपर्क करुन लग्नासाठी मुली दाखविले जातात. नंतर २ ते ५ लाख रुपयेपर्यंत पैसे घेऊन त्यांच्याशी लग्न झालेल्या व त्यांना मुले असलेल्या मुलींशी लग्न लावुन दिले जाते. सदर मुली लग्नानंतर काही दिवस चांगला संसार करतात व विश्वास संपादन करुन घरातुन पैसे, सोने चोरुनं पळून जातात. अशी टोळी जिल्ह्यात सक्रीय असल्याची माहिती मिळाल्याने गुप्त बातमीदारांमार्फत माहीती प्राप्त करून सदर प्रकार उघडकीस आणुन कासोदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांने दिलेल्या फिर्यादीनुसार यातील संशयित महिला आरोपी मोना दादाराव शेंडे (वय-२५ वर्षे), सरस्वती सोनु मगराज (वय-२८, दोन्ही रा. रायपुर,छत्तीसगड), अश्वीनी अरुण थोरात (वय-२६, रा. पांढुरना, मध्यप्रदेश) अशा तिघींचे कासोदा गावांतील ३ तरूणांसोबत संशयित सरलाबाई अनिल पाटील (वय-६० वर्षे), उषाबाई गोपाल विसपुते (वय-५०, दोन्ही नादेड ता. धरणगाव) यांनी दि. १६ एप्रिल रोजी लग्न लावुन दिलेले होते. यातील एका संशयित आरोपी हीने कबुल केले की, आम्हीं तिचे या पुर्वी लग्न झालेले असुन आम्हांला मुले आहेत व आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करणेसाठी घरुन महाराष्ट्रात आलेलो आहोत.
फिर्यादी व त्यांचे दोन साथीदार अशांना एजंट महिला संशयित आरोपी सरलाबाई अनिल पाटील, उषाबाई गोपाल विसपुते यांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवुन वेळोवेळी संपर्क करून, खोटे सांगितले. लग्नासाठी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्याकडुन एकत्रीत ४ लाख १३ हजार रुपये उकळले. संशयित तिन्ही वधू मोना शेंडे, अश्विनी थोरात, सरस्वती मगराज यांचे यापुर्वी लग्न झालेले असुनसुध्दा त्यांनी ती माहिती लपवुन फिर्यादीची व त्यांच्या दोन साथीदारांची आर्थिक फसवणुक केली.
सदर आंतरराज्य टोळी जेरबंद करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर-पवार, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंह राजपुत, सफौ रविंद्र पाटील, पोहेकॉ राकेश खोंडे, पोना किरण गाडीलोहार, पोकों/ इम्रान पठाण, पोकाँ नितिन पाटील, मपोकाँ/ सविता पाटील अशा पथकाने कारवाई केली.