विश्वजित चौधरी
जळगाव – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, प्रशासन आणि शासनाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात कोरोना रोखण्यात यश येत आहे. रुग्णांशी सतत संवाद, वैद्यकीय यंत्रणेला सतत मार्गदर्शन यामुळे कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यश येत आहे.
कोरोना जगभर जेव्हा सुरु झाला त्यावेळेला जगभर ऑनलाईन वेबिनार सुरु होते. या वेबिनारमध्ये चीन, अमेरिका, इंग्लंड अशा देशांसह भारतातील देखील डॉक्टर सहभागी झाले होते. या डॉक्टरांमध्ये जळगावचे डॉ. लीना अनुज पाटील यांच्यासह अनेक डॉक्टर यांनी भाग घेतला. कोरोना काय आहे, तो होतो कसा, त्याची लक्षणे, उपचार याबाबत वेबिनारमधून सविस्तर माहिती मिळत होती. त्यामुळे आजाराची थेरी समजून आली होती. जळगावात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जेव्हा आले होते, त्यांनी टास्क फोर्सची स्थापना करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यानुसार ४ जूनला जिल्ह्याच्या टास्क फोर्समध्ये डॉ. लिना पाटील, डॉ. सुनील चौधरी, डॉ. राहुल महाजन, डॉ. कल्पेश गांधी, डॉ. सुशील गुर्जर, डॉ. पंकज बढे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. निलेश चांडक, डॉ. गुणवंत महाजन, डॉ. अभय जोशी यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन, प्लाझ्मा थेरेपीचे युनिट देखील टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार याच काळात सुरु झाले. याचा फायदा कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला झाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात टास्क फोर्सने भेट दिल्यावर तेथे काही उणीवा त्यांना दिसल्या. त्या उणिवांवर सूचना देऊन जिल्हाधिकारी तथा अधिष्ठात्यांना बदल करण्याचे सांगितले. महत्वाचे म्हणजे कोरोनाच्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना उपचारांविषयी माहिती विचारली. त्यानंतर मृत्यूदर कमी होण्यासाठी ऑक्सिजन खाटा वाढविणे, मनुष्यबळ वाढविणे, औषधींचा साठा वाढविणे याबाबत सतत सूचना दिल्या. त्याप्रमाणे बदल होऊन कोरोना आटोक्यात आणला आहे. याचे श्रेय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि त्यांच्या डॉक्टर, परिचारिका टीमसह टास्क फोर्सला जाते. यासाठी सातत्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.