भुसावळ रेल्वे पोलिसांची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) :- सध्या उन्हाळ्याच्या सुट्यामुळे रेल्वे गाडीत वाढती गर्दी लक्षात घेता व गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे मुश्किल झाले असताना त्याचा फायदा दलाल घेताना दिसून येत आहेत. मंगळवारी जास्त पैसे घेऊन तिकिटाचा काळाबाजार करणाऱ्या दलालास रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले व गुन्हा दाखल केला आहे.
संशयित दलालाचे नाव युसूफ खाटीक (४४, रा. मिल्लत नगर, भुसावळ) असे आहे. रेल्वे आरक्षण केंद्रावर उपनिरीक्षक सुदामा यादव, हेकॉ नीलेश अधवल, विलास बोरोले यांनी युसूफ खाटीकला ताब्यात घेतले. त्याने रेल्वे तिकिटे देण्यासाठी कोणताही परवाना दाखवला नाही. याप्रकरणी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी यांनी अटक केलेल्या संशयित व्यक्तीचा कबुली जबाब घेतला. यात युसूफ खाटीकने ओळखीच्या मंजूर खान रुक्सिन खानला रेल्वे आरक्षण तिकिटे देऊन काळाबाजार केल्याचा गुन्हा कबूल केला. तिकिटाच्या किंमती व्यतिरिक्त कमिशन म्हणून २०० रुपये घेतल्याचे सांगितले.