सोमवारपासून आठवडाभर बंद, जेष्ठ नागरिकांना सूट
जळगाव (प्रतिनिधी) : आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी भुसावळ विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा उद्देश आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध दि. १० मार्च ते दि. १६ मार्चपर्यंत प्रभावी राहतील. भुसावळ विभागातील नाशिक, मनमाड आणि भुसावळ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री प्रतिबंधित असेल. प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.