भुसावळ रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : – खंडवा ते भुसावळ दरम्यान विना तिकिट कर्नाटक एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशाचा तिकिट निरीक्षकांना संशय आला. सतर्कता बाळगून त्या प्रवाशाची सखोल चौकशी केली असता त्याने दोन मोबाईल चोरल्याची कबुली दिली. या प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बल कार्यालयात तक्रार नोंदवण्यात आली असून चोरट्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कर्नाटक एक्सप्रेसमधून खंडवा ते भुसावळ दरम्यान शयनयान कोचमध्ये तिकीट तपासणीदरम्यान चल तिकिट निरीक्षक आर. पी. राम, अजय खोसला आणि मुख्य तिकीट निरीक्षक ए. के. सोनी यांनी एक संशयास्पद प्रवासी पकडला. तो तिकीटविना प्रवास करत होता. प्रवाशाने सुरुवातीला पैसे नसल्याचे सांगितले, नंतर ऑनलाइन पेमेंट करण्याची तयारी दर्शवली. या प्रवाशाकडे दोन मोबाइल होते. परंतु, दोन्ही मोबाइलचे पासवर्ड लॉक होते, तर तो ते उघडू शकत नव्हता. याशिवाय, दोन्ही मोबाइलमध्ये सिम कार्ड नव्हते. त्याने आपल्या पर्समधून सिम काढून मोबाइलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिकीट निरीक्षकांना हे मोबाइल चोरीचे असू शकतात, असा संशय आला.
त्यानंतर त्या प्रवाशाला पॅट्री कारमध्ये नेऊन विचारपूस केली असता त्याने मोबाइल चोरीची कबुली दिली. त्यानंतर अजय खोसला यांनी एस-२ आणि एस-३ कोचमधील प्रवाशांची विचारपूस केली. काही प्रवाशांनी इटारसी ते बुऱ्हानपूर दरम्यान त्यांच्या मोबाइलची चोरी झाल्याचे सांगितले. यात अक्षय प्रताप सिंह या प्रवाशाचा एक मोबाईल होता. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मोबाइलमध्ये जिओचे दोन सिम होते, जे चोरट्याने काढून फेकले.
दरम्यान, संशयित मोबाइल चोर दिनेश लक्ष्मणराव याने दोन्ही मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी प्रवासी अक्षय सिंह यांनी भुसावळ स्टेशनवर जीआरपी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली. तर पकडलेल्या चोरट्याला पुढील कारवाईसाठी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाकडे सुपूर्द करण्यात आले.