अमळनेर येथे जळगाव एसीबीची धडक कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) :- येथील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना केलेल्या कामाच्या बिलातून टक्केवारी हिस्स्यातील ४ हजारांची लाच स्विकारतांना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत रंगेहात पकडले आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप दत्तात्रय पाटील (वय ५५) असे उपविभागीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार हे खासगी ठेकेदार म्हणून काम करतात. त्यांनी चोपडा तालुक्यातील मौजे व मजरे हिंगोणे येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थानाचे ३ लाख ५५ हजार रूपयांचे काम पुर्ण केले हेाते. १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदार यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठाच्या अमळनेर कार्यालयात गेले असता तेथे विभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी बिलच्या रकमेतील २ टक्के म्हणजे ७ हजार रूपयांची लाच मागितली. दरम्यान तक्रारदार यांनी याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांना ४ हजार रूपयांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडले, याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कामगिरी पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर, नंदुरबार विभागाच्या निरीक्षक रेश्मा अवतारे, हेमंतकुमार महाले, जळगावचे कर्मचारी विलास पाटील, नरेंद्र पाटील, राकेश दुसाने यांनी केली आहे.