मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयुचा शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाला.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यु रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून टेलीआयसीयु प्रकल्प त्यासाठी उपयुक्त ठरत आहे. त्याच्या मदतीने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगत टेलिआयसीयूचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
राज्यात भिवंडी, औरंगाबाद, जालना, सोलापूर पाठोपाठ आज जळगाव आणि अकोला येथील रुग्णालयांमध्ये टेलिआयसीयुचा शुभारंभ आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ एन. एस. चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात विशेषज्ञांची जाणवणारी कमतरता टेलीआयसीयु तंत्रज्ञानामुळे काहीशी भरून निघणार असून कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर विशेषज्ञांच्या मार्गदर्शनातून उपचार झाले तर मृत्यूदर कमी होण्यासाठी त्याचा लाभ होईल.
राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा गंभीर रुग्णांना ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.
राज्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही सुविधा सध्या सहा जिल्ह्यांमध्ये सुरु असून राज्यात अन्यत्र देखील सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली असून ते याबाबत सकारात्मक आहेत. ही सेवा राज्यभर सुरु झाल्यास दुर्गम भागातील रुग्णांना देखील विशेषज्ञांच्या उपचाराचा लाभ मिळू शकेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. मेडीस्केप इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून ही सुविधा देण्यात येत आहे. यावेळी मेडीस्केप इंडिया फाउंडेशनच्या डॉ. सुनिता दुबे यांनी या तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली.