जामनेर तालुक्यातील पहूर जवळ भीषण अपघात
पहूर (प्रतिनिधी):- जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूरजवळ आज दुपारी घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात कार पेटून जान्हवी संग्राम मोरे (वय 21, मूळ रा. गुलखेडा जि. बुलढाणा) या विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

जान्हवी मोरे या त्यांचे पती संग्रामसिंग जालीमसिंग मोरे यांच्यासह चारचाकीतून छत्रपती संभाजीनगरकडे जात होत्या. गाडी पिंपळगाव फाटा, पहूरजवळ आली असता, कारचा टायर अचानक फुटला.टायर फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि ती महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारमधून तत्काळ धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या.
अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक आणि वाहतूक पोलिसांनी त्वरीत धाव घेतली.त्यांनी तातडीने कारच्या पुढील काचा फोडून पती संग्राम मोरे यांना बाहेर काढण्यात यश मिळवले.
ग्रामस्थ, वाहतूक पोलीस, पहूर पोलिस, महामार्ग पोलिस, आरटीओ कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येत दगडांनी काचा तोडून जान्हवी यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.परंतु, तोपर्यंत कारला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आणि आग भडकत गेल्याने जान्हवी यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही.









