जामनेर तालुक्यातील पळासखेडाजवळील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड-भोसले या जामनेरवरून जळगाव येथे शुक्रवार दि. २२ रोजी येत असताना पळसखेडा येथील पुलावर त्यांच्या कारचा टायर फुटल्याने अपघात झाला. ही घटना सकाळी दहा वाजता घडली. यावेळी प्रसंगावधान राखत त्यांनी हॅण्डब्रेक वेळीच ओढल्याने गाडी जागेवर थांबल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
जळगाव महापालिकेच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड भोसले या मुलीसह शुक्रवारी सकाळी जामनेर येथून जळगाव येथे येण्यासाठी स्वतः कार चालवत होत्या. जामनेरच्या पुढे पळसखेडा गावाजवळ दहाच्या सुमारास पुलावर वाहन आले. तेव्हा चालकाच्या बाजूचे टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले; मात्र गायकवाड यांनी समयसूचकता दाखवत तत्काळ वाहनाचा हॅण्डब्रेक ओढल्याने वाहनाचा वेग कमी झाला आणि कार पुलाच्या कठड्यावर आदळून थांबली. या घटनेत गायकवाड यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. सीटबेल्ट लावलेला असल्याने त्या व त्यांची मुलगी बचावल्या आहेत.