आ. मंगेश चव्हाण यांचा महिला भगिनींनी केला जाहीर सत्कार
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगावात टवाळखोरांच्या अड्ड्यावर बुलडोझर चालवून तो नष्ट करण्यात आला. आ. मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत न.पा.ची धडक कारवाई कौतुकाचा विषय ठरली. याबाबत परिसरातील महिला व मुलींनी आ. चव्हाण यांचा सत्कार केला.
शहरातील पाटणादेवी रोडवरील आदित्य कॉलनी भागात काही दिवसांपूर्वीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या भागात असणाऱ्या अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी काही टवाळखोर मुले येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढत असल्याच्या देखील तक्रारी होत्या. याबाबत भागातील महिलांनी आ. मंगेश चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना होणारा त्रास कथन केला व आदित्य कॉलनी मधील टवाळखोरांचा तो अड्डा पाडून टाकण्याची विनंती केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना फोन करून सदर बांधकाम पाडण्यासाठी यावे असे कळविले व तात्काळ स्वतः महिलांसोबत त्या भागाला भेट दिली.
तिथे असणाऱ्या टवाळखोरांच्या अड्ड्यांची पाहणी केली व त्या अनधिकृत जागा जेसीबीने उध्वस्त केल्या. आ. मंगेश चव्हाण यांच्या या धडाकेबाज बुलडोझर कारवाईमुळे परिसरातील महिलांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हाकेला धावून येत तात्काळ बंदोबस्त केल्याबद्दल परिसराच्या वतीने आ. मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तुमचा भाऊ हा नेहमी तुमच्या सोबत असून कुठल्याही प्रकारची अडचण आली तर मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. तसेच या भागातील नगरपालिकेच्या खुल्या जागांना देखील तार कंपाउंड करण्याचे आश्वासन आ. मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिले.