वडील-भाऊ जखमी, शाहूनगर परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शाहूनगर परिसरात हॉटेल धैर्यमजवळ जामिनावर सुटून घरी जात असलेल्या तरुणावर अज्ञात २० ते २५ जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याच्यासोबत असलेले वडील व भाऊ देखील जखमी झाले आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
प्रतीक हरदास निंबाळकर (वय २४, रा. सिटी कॉलनी, कानळदा रोड, जळगाव) असे गंभीर जखमी असलेल्या तरुणाचे नाव आहे. तो ५१ महिन्यांपासून खुनाच्या आरोपाखाली जिल्हा कारागृहात होता. नोव्हेंबर २०२० पासून त्याला जिल्हा कारागृहामध्ये ठेवण्यात आले होते. (केसीएन)दरम्यान शुक्रवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्याचा जामीन झाल्यावर जिल्हा कारागृहातून प्रतीकचे वडील हरदास निंबाळकर आणि भाऊ वैभव निंबाळकर हे त्याला घेऊन दुचाकीवरून घरी जात असताना शाहूनगर भागातील हॉटेल धैर्यमजवळ आले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही पिता पुत्र खाली पडले.
यानंतर हल्लेखोरांनी प्रतीक निंबाळकर याला लक्ष्य करत त्याच्यावर धारदार लोखंडी वस्तू आणि धारदार शस्त्राने डोक्यावर उजव्या बाजूला जोरदार प्रहार करून गंभीर जखमी केले. (केसीएन)तर प्रतीकचे वडील हरदास आणि भाऊ वैभव यांनादेखील दगडांनी व इतर वस्तूंनी मारहाण केली. मारेकरी निघून गेल्यावर प्रतीक निंबाळकर याला त्याचे वडील व भाऊंनी रिक्षात टाकून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले.
या ठिकाणी वैद्यकीय पथकाने अतिदक्षता विभागामध्ये तात्काळ प्रत्येक निंबाळकर यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, जळगाव शहर पोलीस स्टेशनला व एलसीबीला घटना कळताच घटनास्थळ गाठले. तसेच संशयित आरोपी यांच्याविषयी डीवायएसपी संदीप गावित आणि पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी शासकीय रुग्णालयात येऊन माहिती घेतली. दरम्यान प्रतीक निंबाळकर याच्या उजव्या बाजूला डोक्यात कवटी फ्रॅक्चर झाल्याने व डोक्यात रक्तस्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाल्याची माहिती वैद्यकीय पथकाकडून मिळाली आहे.
दरम्यान संशयित हल्लेखोरांची माहिती पोलिसांना मिळाली असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिले आहे. दरम्यान, जळगाव शहरात २ दिवसापूर्वी अयोध्या नगरात झालेल्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.